साक्रीजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
धुळे, साक्री: साक्री शहराजवळील धुळे-सुरत बायपास महामार्गावर, कावठे शिवारात आज एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परिसरात बिबट्याचा वावर वाढला
साक्री नजीक असलेल्या अष्टाने आणि कावठे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचा दावा स्थानिक शेतकरी करत आहेत. महामार्गाच्या आजूबाजूच्या शेतात अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिल्याचेही त्यांनी सांगितले.
या अपघातानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात अजूनही बिबटे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वन विभागाने तात्काळ या बिबट्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या अपघातानंतर घटनास्थळी तातडीने वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस पोहोचले असून, त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.