‘लाडक्या देवाभाऊसाठी राखी’ उपक्रमात धुळे भाजप ग्रामीण राज्यात अव्वल
धुळे: रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने राबवलेल्या ‘लाडक्या देवाभाऊसाठी राखी’ या उपक्रमात धुळे जिल्हा ग्रामीणने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाध्यक्षा सौ. धरतीताई देवरे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १ लाख ७१ हजार राख्या आणि शुभेच्छा पत्रांचे संकलन करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे सौ. धरतीताई देवरे यांचा विशेष सन्मान केला.
ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमात धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माता-भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी मोठ्या संख्येने शुभेच्छा पत्रे आणि राख्या पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आमचा देवाभाऊ’ या उपक्रमांतर्गत हे सर्व संकलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले.
राज्यभरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत धुळे जिल्ह्याने सर्वाधिक राख्या संकलित करून राज्यात पहिले स्थान मिळवले. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सौ. धरतीताई देवरे यांना या कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह आणि गौरव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.