भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू; बाळदे गावाने मानवी सन्मानाने केला अंत्यविधी
शिरपूर तालुक्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर वसलेले प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे बाळदे गावात एका हृदयद्रावक घटनेचा साक्षीदार ठरले. गावातील काही भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वानराचा मृत्यू झाला. या घटनेने बाळदेकरांच्या अंतःकरणाला मोठी जखम दिली आहे. जखमी अवस्थेत तो वानर गावातील जंगलात पसार झाला आणि उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत अवस्थेत राजेंद्र भगवान पाटील यांना तो आढळून आला. त्यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगताच संपूर्ण बाळदे गाव भावनिक झाले.
यानंतर गावकऱ्यांनी त्या वानराचा अंत्यविधी मानवी सन्मानाने केला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव शोकमग्न झाला होता. इतकेच नव्हे तर, गावकऱ्यांनी पाच दिवसांचा दुखवटा जाहीर करून आपली श्रद्धा व्यक्त केली. हनुमान चालीसा पठण करून या विधीची सुरुवात झाली. गावातील साधारण अडीच ते तीन हजार लोकसंख्येपैकी सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, गावातील पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केला, तर महिलांनीही सुतक पाळून श्रद्धांजली वाहिली…