धुळ्यात डीजे बंदीसाठी डॉक्टरांचा मूक मोर्चा; अनेक शाळकरी विद्यार्थी सामाजिक संघटना मोर्चात सहभागी
धुळे: डीजेच्या कर्कश आवाजावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करत आज धुळे शहरातून इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या डॉक्टरांच्या संघटनेने भव्य मूक मोर्चा काढला. ‘डीजे’मुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या मोर्चात अनेक शाळकरी विद्यार्थी, बार असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने डीजेच्या आवाजाबाबत कठोर निर्देश दिले असले तरी, धुळे शहरासह जिल्ह्यात या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याने डीजेचा दणदणाट सुरूच असून, त्यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डीजेमुळे आरोग्याला धोका
डीजेच्या अति तीव्र आवाजामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मोर्चात भर देण्यात आला.
* यामुळे कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो.
* लेझर प्रकाशामुळे कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.
* मेंदू आणि हृदयावर आघात होऊन मृत्यूचा धोकाही असतो.
* याशिवाय, गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांसाठी डीजेचा आवाज अत्यंत घातक असतो.
या सर्व बाबी लक्षात घेता, जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर आणि कायदेशीर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी ‘आयएमए’ने केली आहे.