दहिवेलमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडले; १४ लाखांची रोकड लंपास
धुळे, दहिवेल: साक्री तालुक्यातील दहिवेल गावात अज्ञात चोरट्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील सुमारे १४ ते १५ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सीसीटीव्हीवर स्प्रे मारून चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे दोन चोरटे स्विफ्ट गाडीतून आले. त्यापैकी एकाने एटीएममध्ये प्रवेश करून सर्वप्रथम एटीएममधील कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर, त्याने गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन कापली आणि त्यातील रोकड घेऊन दोन्ही चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.