धुळ्यातून ई-वातानुकूलित बस सुरू करा; वाणी समाज संस्थेची परिवहन मंडळाकडे मागणी
धुळे: महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे धुळ्यातही ई-वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेने केली आहे. धुळे जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे का, असा थेट सवाल करत, संस्थेच्या शिष्टमंडळाने आज राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली.
प्रवाशांची गैरसोय आणि आर्थिक लाभ
धुळे हे अनेक राष्ट्रीय महामार्गांचे केंद्र असल्याने येथून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. सध्या या मार्गांवर आधुनिक शिवशाही ई-बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा संस्थेने मांडला.
संस्थेचे शहराध्यक्ष मोहन येवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय अधिकारी प्रवीण पाटील आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक संजय अवस्थी यांची भेट घेतली.
या वातानुकूलित बससेवेमुळे प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळेल, तसेच धुळे आगाराच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ही बससेवा सुरू झाल्यास व्यापारी, नोकरदार आणि सामान्य नागरिकांची मोठी सोय होईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रतिनिधी, नागिंद मोरे