साक्री तालुक्यातील आश्रम शाळेत आजाराचा कहर; ६१ विद्यार्थी आजारी, १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रम शाळेत तब्बल ६१ विद्यार्थी अचानक थंडी, ताप, खोकला व सर्दीच्या आजाराने ग्रस्त झाले. या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा (वय १२, रा. खरवड, ता. धडगाव, जि. नंदुरबार) या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान, चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांना उपचारानंतर पालकांच्या ताब्यात सोपविण्यात आले असून काहींना पुन्हा आश्रमशाळेत दाखल करण्यात आले आहे.
शाळा प्रशासनाच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना तब्येतीची तक्रार होती. त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
प्रतिनिधी – नागिंद मोरे