
धुळे हादरले! माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी घटना


धुळे, प्रतिनिधी: धुळे शहराला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना स्नेहनगर भागात घडली आहे. धुळे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज सोनल शिंदे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वाढदिवसानंतर अवघ्या दोन दिवसांत दुर्दैवी अंत
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच विराजचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत साजरा करण्यात आला होता. या आनंदोत्सव साजरा झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विराजने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या दिवशी विराज घरी एकटाच होता. कुटुंबीय बाहेर गेले असताना त्याने गळफास घेतला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ विराजला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विराजच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत आणि आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विराजच्या निधनाने शिंदे कुटुंबावर आणि त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



