धुळ्याचा २० वर्षीय तरुण ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये; उमलिंगला पास यशस्वीपणे गाठला
धुळे शहरासाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. येथील २० वर्षीय तरुण मोहक मनीष मेहता याने केवळ १४९ सीसी क्षमतेच्या मोटारसायकलवरून तब्बल ५,८८५ किलोमीटरचा प्रवास करत जगातील सर्वात उंच मोटार चालण्यायोग्य रस्ता, म्हणजेच लडाखमधील उमलिंगला पास (१९,३०० फूट) यशस्वीपणे गाठला आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे.
कमी क्षमतेच्या बाईकवर मोठा पराक्रम
मोहक मेहता याने यामाहा एफझेड या १४९ सीसी क्षमतेच्या मोटरसायकलवरून हा अविश्वसनीय प्रवास पूर्ण केला. हा पराक्रम अधिक विशेष यासाठी ठरतो, कारण कमी क्षमतेच्या बाईकवर अत्यंत कठीण हवामान आणि भौगोलिक परिस्थितीचा सामना करत त्याने ही राईड यशस्वी केली. या प्रवासात त्याचे काका भरत अरुण मेहता हे हिमालयन ४११ सीसी मोटरसायकलवरून त्याच्यासोबत होते.
बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) ने बांधलेल्या या अत्यंत अवघड रस्त्यावरुन प्रवास करणे हे साहस, सहनशक्ती आणि दृढनिश्चयाचे प्रतीक मानले जाते. या विक्रमामुळे मोहकने केवळ वैयक्तिक यश मिळवले नाही, तर त्याने धुळ्याचे नावही देशाच्या नकाशावर कोरले आहे.
मोहक हा नॉर्थ पॉइंटचा विद्यार्थी असून, त्याची आई बरखा मेहता चावरा स्कूलमध्ये शिक्षिका आहेत आणि वडील मनीष मेहता व्यावसायिक आहेत. त्याच्या या धाडसी पराक्रमामुळे अनेक तरुण रायडर्सना प्रेरणा मिळाली असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.