
Dhule Crime सुट्ट्या पैशांवरून वाद; धुळ्यात रिक्षाचालकाकडून महिलेला बेदम मारहाण


धुळे: धुळ्यात सुट्ट्या पैशांवरून झालेल्या वादानंतर एका रिक्षाचालकाने महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रिक्षाचालकाने त्या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीलाही मारहाण केली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
राणी शिवदे नावाच्या महिलेने नरेंद्र अहिरे नावाच्या रिक्षाचालकाच्या रिक्षातून सावरकर पुतळा येथे प्रवास केला. भाडे दिल्यावर महिलेने पाचशे रुपयांची नोट दिली. रिक्षाचालकाने सुट्ट्या पैशांची मागणी केली असता महिलेकडे सुट्टे पैसे नव्हते. यावरून रिक्षाचालकाने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या वादानंतर परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणी शिवदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक एवढ्यावरच थांबला नाही. त्याने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेच्या सोबत असलेल्या तिच्या ४ वर्षांच्या मुलीलाही त्याने मारहाण केली.
या घटनेनंतर देवपूर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक नरेंद्र अहिरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



