
धुळे जिल्ह्यात भीषण अपघात! दोन ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार, ७० बकऱ्यांचा मृत्यू


मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेचार वाजता झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 60 हून अधिक बकऱ्यांचा मृत्यू झाला असून महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
मध्यप्रदेश येथून शिरपूरच्या दिशेने बकऱ्यांनी भरलेला ट्रक येत असताना बिजासनी घाट परिसरातील भिलट बाबा मंदिराजवळ मागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेत बकऱ्यांचा ट्रक उलटला तर दुसरा ट्रक लोखंडी रेलिंगवर आदळून चक्काचूर झाला.
अपघातात राजू सलीम कुरेशी (मृत), तर जावेद कुरेशी व दीपक वर्मा (गंभीर जखमी) असून त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी मृत बकऱ्यांचा खच पडलेला होता. मका व लोखंडी तुकडे रस्त्यावर विखुरले होते. महामार्ग पोलिस, स्थानिक पोलीस व नागरिकांनी एकत्रितपणे मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास शिरपूर पोलिस ठाण्यात सुरु आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



