मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; शॉर्ट सर्किटमुळे कंटेनरला भीषण आग
धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील देवभाने फाट्याजवळ काल (२५ ऑगस्ट २०२५) रात्रीच्या सुमारास गहू घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला.
चालकाने उडी मारून वाचवला जीव
शिरपूरहून धुळ्याच्या दिशेने जात असताना हा कंटेनर देवभाने फाट्याजवळ आला, आणि त्याला अचानक आग लागली. ही बाब वाहनचालकाच्या वेळीच लक्षात आल्याने, त्याने गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, आगीमुळे गहूने भरलेल्या कंटेनरची संपूर्ण केबिन जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सोनगीर पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.