धुळ्यात ‘साधू’च्या वेशातील लुटारू टोळी गजाआड; लळींग घाटातील दरोड्याचा २४ तासांत छडा
धुळे, मोहाडी: धुळ्यातील लळींग घाटात साधूचा वेश परिधान करून प्रवाशांना धमकावून लुटमार करणाऱ्या ‘नाथसफेरे’ टोळीला गजाआड करण्यात मोहाडी पोलिसांना मोठे यश आले आहे. अवघ्या २४ तासांच्या आत गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी उत्तराखंड राज्यातील पाचही ठगांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमके काय घडले?
ललिता नरेंद्र पाटील (रा. खाचणे, जि. जळगाव) या कुटुंबासह क्रुझर वाहनाने तुळजापूर-पंढरपूर येथून देवदर्शन करून धुळ्याकडे परतत होत्या. लळींग घाटात साधूच्या वेशातील काही इसमांना पाहून भावनावश झालेल्या वाहनचालक भगवान पाटील यांनी गाडी थांबवली. साधूंनी पाणी मागितले आणि आशीर्वाद घेण्यास सांगितले.
याचा फायदा घेत, वाहनातील इतरांना गाडीत बसवून सुनंदाबाई आणि सरलाबाई यांना खाली थांबण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी, एका इसमाने अचानक चाकू काढत ‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या सुनंदाबाई यांनी त्यांच्या गळ्यातील ७ ग्रॅमची मणीमाळ आणि कानातील टॉप्स तसेच सरलाबाई यांनी त्यांच्याकडील ५ ग्रॅमची माळ ठगांना दिली.
या धाडसी लुटीत ठगांनी १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला आणि Swift Dzire कारने ते पसार झाले होते.
पोलिसांची तत्पर कारवाई
या घटनेनंतर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, अवघ्या २४ तासांत पाचही लुटारूंना गजाआड करण्याची कामगिरी केली.
अटक करण्यात आलेले आरोपी (सर्व रा. धेसूपुरा, सफेरा बस्ती, हरिद्वार, उत्तराखंड):
1. विक्की मोसमनाथ नाथसफेरे
2. सौदागर बाबुनाथ नाथसफेरे
3. गोविंदनाथ ककुनाथ नाथराफेरे
4. जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे*l
5. क्रांता मौसमनाथ नाथसफेरे
पोलिसांनी या लुटारूंकडून चोरीस गेलेला ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केल्याची माहिती दिली आहे. या कारवाईमुळे धार्मिक वेशाचा गैरवापर करून लुटमार करणाऱ्या टोळीला मोठा चाप बसला आहे.