
धुळ्यात ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या निवासस्थानासमोर संभाजी ब्रिगेडचे डफली वाजवत आंदोलन…


“ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा” घोषणाबाजीने परिसर दणाणला….
राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून, धुळे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अनिल देसले यांच्या नेतृत्वात धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या निवासस्थानासमोर डफली वाजवून सरकारला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या, आणि जनावरांच्या बाजारभावानुसार नुकसानभरपाई द्या” अश्या घोषणा देत जोरदार आंदोलन करीत मागणी केली…
त्यानंतर आमदार राम भदाणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरामुळे शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली, शेतजमिनी खरडून गेल्या, घरे, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. हजारो जनावरे मृत्युमुखी पडली असून शेतकऱ्यांची जगण्याची उमेद हरवत आहे. अशा परिस्थितीत “सरकारने निकषांच्या चौकटीत न अडकता, तिजोरी खुली करून शेतकरी व पुरग्रस्तांना थेट मदत करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली….



