
धुळ्यातील नकाणे गावात २० लाखांचे सुलभ शौचालय चोरीला! शिवसेना ठाकरे गट आक्रमक


धुळे: धुळे महानगरपालिकेच्या कारभारावर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जुन्या प्रभाग क्रमांक सहा (नकाणे गाव) मधील आदिवासी वस्तीसाठी २० लाख रुपये खर्चून बांधलेले १० आसनी सार्वजनिक शौचालय चक्क जागेवरून ‘चोरीला’ गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
२० लाख रुपये खर्च, पण शौचालय नाही!
शिवसेनेचे विधी व न्याय विभागाचे प्रमुख ॲड. भूषण उर्फ बंटी पाटील यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या चौकशीतून हा भ्रष्टाचार समोर आला आहे.
निधी मंजुरी: सन २०२१-२२ मध्ये महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाणे गावातील आदिवासी वस्तीत रु. १९,९८,८७८ निधी १० आसनी सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी मंजूर झाला.
बिल काढले: ‘मे. आदर्श कन्स्ट्रक्शन’ या कंत्राटदाराने ०९-०२-२०२३ रोजी काम पूर्ण झाल्याचे दाखवून मनपाच्या तिजोरीतून जवळपास २० लाख रुपयांचे बिल काढून घेतले.
सत्यस्थिती: ॲड. बंटी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता, ज्या श्री. मगन मातंग यांच्या घराशेजारी शौचालय बांधल्याचा उल्लेख आहे, त्यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी कुठल्याही सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम झालेले नाही.
‘शौचालयांची विष्ठा खाणारे महाभाग कोण?’
शौचालय अस्तित्वात नसताना बिल काढल्याने शिवसेनेने मनपा आयुक्त, संबंधित प्रभागाचे इंजिनिअर आणि स्थानिक भाजपचे माजी नगरसेवक यांच्यावर संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ॲड. बंटी पाटील म्हणाले, “आतापर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक किस्से झाले, पण आता महानगरपालिका प्रशासनाची मजल शौचालयांमधील विष्ठा आणि विष्ठेचा मलिदा खाण्यापर्यंत गेली आहे.” आजही आदिवासी वस्तीतील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने लवकरच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात ‘सुलभ शौचालय हरवल्याची’ तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच, भ्रष्टाचारींवर गुन्हे दाखल होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दिला आहे.



