
धुळ्यात बचत गटाच्या पैशावर डल्ला! पोलिसांची धडक कारवाई, चोवीस तासांत सहा आरोपींना अटक


धुळे (प्रतिनिधी) – धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बचत गटाच्या पैशावर झालेला दरोडा उघडकीस आणत सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 80,700 रुपये रोख व 50,000 किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यामुळे एकूण 1,30,700 रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
घटना कशी घडली?
26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता तक्रारदार खुशाल मोतीराम पाटील (रा. उतराण, पारोळा, जि. जळगाव) हे बाबरे गावातून बचत गटाची रक्कम गोळा करून खोरदड तांड्याकडे जात होते. शिरुड–खोरदड रस्त्यावर सहा जणांनी त्यांना अडवून मारहाण केली आणि 1.17 लाख रुपयांची लूट केली.
या घटनेची नोंद गुन्हा क्र. 591/2025 भारतीय दंड संहिता कलम 310(2), 126(2) अंतर्गत धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पोलिसांची धडक कारवाई
गुन्ह्याची माहिती मिळताच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील यांनी तातडीने तपास सुरू केला.
तक्रारदाराने दिलेल्या वर्णनावरून आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर घरझडतीत 80,700 रुपये रोख व 50,000 किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.
अटक आरोपींची नावे
- पंकज अशोक सोनवणे (25)
- दिपक लक्ष्मण भिल (19)
- माणिलाल सुकदेव भिल (28)
- विनोद हिम्मत भिल (21)
- सचिन मोहन भिल (20)
- योगेश उत्तम भिल (27)
सर्व रा. बाबरे, ता. धुळे
पुढील कारवाई
29 सप्टेंबर रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरोड्याचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस ठाण्याचे PSI कृष्णा पाटील करीत आहेत.
प्रतिनिधी नागिंद मोरे



