
Dhule शिक्षणाधिकारी यांच्यावर खुर्ची जप्तीची कारवाई; न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी टाळल्याने कारवाई


धुळे: गुरुदत्त विद्या प्रसारक मंडळाच्या माजी मुख्याध्यापकाचे १ कोटी ३६ लाख रुपयांचे थकीत वेतन वसूल करून देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे, धुळे न्यायालयाने अखेर शिक्षण विभागावर कारवाई केली. आज (आज) माजी मुख्याध्यापकांनी वकिलांसोबत येऊन शिक्षणाधिकारी कार्यालयातील खुर्ची जप्त केली.
थकीत पगारासाठी मुख्याध्यापकाची लढाई
गुरुदत्त विद्या प्रसारक संचालित आदर्श माध्यमिक विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास पाटील यांना संस्थेच्या संचालक मंडळाने १० वर्षे पदावर असताना बेकायदेशीरपणे निलंबित केले होते आणि त्यांचा थकीत पगारही दिला नव्हता.
याविरोधात विश्वास पाटील यांनी वकील ॲड.मार्फत शाळा प्राधिकरण न्यायालय, नाशिक येथे याचिका दाखल केली.
- कोर्टाचा निर्णय: शाळा प्राधिकरण न्यायालयाने याचिका मान्य केल्यानंतर, धुळे न्यायालयाने विश्वास पाटील यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने शिक्षण विभागाला आदेश दिले की, संबंधित संस्थेकडून १ कोटी ३६ लाख रुपये थकीत वेतन वसूल करून पाटील यांना द्यावे.
कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली, खुर्ची जप्त
धुळे न्यायालयाने आदेश देऊनही जिल्हा शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयाने अखेर शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्तीचे आदेश दिले.
आज विश्वास पाटील यांनी त्यांचे वकील ॲड. निलेश चौधरी यांना सोबत घेऊन खुर्ची जप्तीसाठी शिक्षण विभागात धाव घेतली. शिक्षणाधिकारी बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असलेल्या उपशिक्षणाधिकारी ठाकूर मॅडम यांच्या खुर्चीवर न्यायालयाच्या आदेशाने जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या घटनेमुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



