
धुळे : गोडाऊनवर जेसीबी फिरवून २० लाखांचे नुकसान; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


प्रतिनिधी : नागिंद मोरे | धुळे
धुळे तालुक्यातील नेर गावात गोडाऊनवर बेकायदेशीररित्या जेसीबी फिरवून तब्बल २० लाख रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना तुषार भटुलाल जयस्वाल यांच्या मालकीच्या जमिनीवर घडली. जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींनी न्यायालयीन आदेशांशिवाय त्यांच्या गोडाऊनचे तोडकाम करून नुकसान केले, तरीही धुळे तालुका पोलिसांनी अद्याप कोणतीही फिर्याद नोंदवलेली नाही.
जयस्वाल यांनी या संदर्भात तालुका पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार दिली असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत जयस्वाल यांनी सांगितले की,
“मी ही जमीन ५ लाख रुपयांना रितसर पावतीसह खरेदी केली होती. मात्र, कुसुंबा येथील अक्षय जैन यांनी वारसांचे मृत्यू दाखले नसताना बनावट खरेदी दाखवली. नंतर त्यांनी किरण शिंदेसह गावगुंडांना घेऊन माझ्या जमिनीवर जबरदस्ती ताबा घेतला आणि गोडाऊन जेसीबीने तोडले.”
जयस्वाल यांनी संताप व्यक्त करत सांगितले की,
“ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडली असूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, हे दुर्दैवी आहे.”
या घटनेमुळे नेर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतूनही होत आहे.



