
शिरपूर तालुका ‘अतिवृष्टीग्रस्त’ घोषित करा — शिरपूर फर्स्ट संघटनेची मागणी!


धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
शिरपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.
संघटनेचे प्रमुख हंसराज चौधरी यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील बहुतेक भागांतील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतजमिनीतील पिके पूर्णतः नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले आहे.
या अतिवृष्टीमुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असून, या कुटुंबांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
चौधरी म्हणाले,
> “शासनाने तातडीने शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त भागात समावेश करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसेच पीकविमा योजना आजही शेतकऱ्यांसाठी उपयोगाची ठरत नाही, त्यामुळे विमा मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करावी.”
संघटनेने इशारा दिला आहे की, जर शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर दिवाळीनंतर शेतकरी एल्गार मोर्चा काढण्यात येईल.



