
Dhule ATM Robbery; शिरपूरमध्ये मध्यरात्री गॅस कटरने एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास!


धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंबिका नगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केली.
ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली असून, एटीएममधील दोन रोकड ट्रे पूर्णपणे रिकामे आढळले आहेत. काही रोकड मात्र मशीनजवळच पडलेली होती. चोरट्यांनी हे कृत्य अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, शिरपूर शहर पोलिसांच्या दोन पथकांना त्यांच्या मागावर पाठविण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे, उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणीसह तांत्रिक तपास सुरू असून, लवकरच चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



