धुळे पोलिसांची ‘रन फॉर युनिटी’ रॅली; महिला अत्याचार व सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा संदेश
धुळे प्रतिनिधी: नागिंद मोरे
महिला अत्याचार प्रतिबंध आणि सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने धुळे पोलिसांनी आज “रन फॉर युनिटी 2025” रॅलीचे आयोजन केले.
या रॅलीत पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींच्या हातात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणारे प्रबोधनात्मक बॅनर झळकत होते.
रॅलीला सुरुवात धुळे शहरातील बसस्थानकासमोरील पोलीस मुख्यालयातून करण्यात आली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला.
“रन फॉर युनिटी” हा उपक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जात आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ही धाव आयोजित करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि ‘एक भारत, आत्मनिर्भर भारत’ या तत्त्वांचा प्रसार आणि संवर्धन करणे हा आहे.
धुळे पोलिसांनी घेतलेली ही रॅली नागरिकांमध्ये जागृतीचा संदेश देणारी ठरली.


