धुळे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई — घरफोडी करणारा सराईत चोर मुद्देमालासह जेरबंद
धुळे (प्रतिनिधी): देवपूर परिसरातील श्रीरंग कॉलनी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ दोन दिवसांत करत सराईत आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व चांदीचे दागिने असा एकूण ₹21,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते 27 ऑक्टोबरच्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने देवपूरमधील श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नं.12 येथील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनमध्ये भाग-5 गु.र.नं.226/2025 BNS क.305, 331(4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने तातडीने तपास सुरू केला. परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक माहिती आणि माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयितावर लक्ष ठेवले. अखेर 28 ऑक्टोबर 2025 रोजी धुळे-शिरपूर महामार्गावरील साई किशन हॉटेलसमोरून प्रकाश उर्फ शिवा विजय पावरा (वय 25, रा. तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याला ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत त्याने सदर घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ₹21,200 किंमतीची रोख रक्कम आणि चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. या यशस्वी कारवाईमुळे देवपूर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
आरोपी प्रकाश पावरा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही विविध चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी काही घरफोडी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


