शिरपूर तालुक्यात झेंडू फुलांना भाव नाही; संतप्त शेतकऱ्याने सोन्यासारख्या पिकावर फिरवला रोटाव्हेटर!
शिरपूर, धुळे; झेंडूला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून एक एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली. सुरूवातीला चांगले बाजारभाव ही मिळाले पण आता बाजारभाव कोसळल्याने झेंडूची फुले तोडणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चांगलेच वैतागले असून शिरपूर तालुक्याच्या शिंगावेभागातील मुकुल महेंद्र पाटील या शेतकऱ्याने सोन्या सारख्या असलेल्या एक एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला आहे.
शिंगावे शिवारातील मुकुल पाटील यांची शेती आहे. त्यांनी आडीच ते तीन महिन्यांन पूर्वी कलकत्ता झेंडूचे रोपे विकत घेवून एक एकर शेतात या झेंडूची लागवड केली होती. त्यासाठी फवारणी, खते औषधे यांचा मोठा खर्च केला. काही महिन्यानंतर झेंडूचे उत्पादन सुरू झाले. गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांना चांगले बाजारभाव ही मिळाले. पण कालंतराने झेंडूचे बाजारभाव पाच ते दहा रूपये किलो झाले. त्यामुळे पाटील यांनी पुन्हा बाजारभाव वाढतील म्हणून झेंडूची फुले न तोडण्याचा निर्णय घेतला. तरीही एकदा त्यांनी फुले तोडून शेतीच्या बांदावर टाकून दिली होती.
त्यानंतरही बाजारभाव न वाढल्याने व तोडण्यासाठी परवडत नसल्याने ते चांगलेच वैतागले होते. जवळपास एक एकर झेंडू साठी त्यांचा विस ते पंचवीस हजार रूपयांचा खर्च झाला होता. शेवटी पाटील यांनी वैतागून सोन्या सारख्या एक एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला आहे. आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. निसर्ग चक्रिवादाळाचे संकट, मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही पावसाने हिरावून नेला. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सगळीकडूनच मरण झाले आहे. आज शेतकऱ्यांना कोणीच वाली राहीले नाही. त्यामुळे आजच्या घडीला बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे…
प्रतिनिधी: नागिंद मोरे


