धुळे: इच्छुक उमेदवाराचा हटके प्रयोग — 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिला वचननामा; भाजपाकडे उमेदवारीची मागणी करणार
धुळे प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळे अनोखे प्रयोग पाहायला मिळत आहेत. असाच एक हटके प्रयोग धुळे शहरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार यांनी केला आहे.
सोनार यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपला वचननामा आणि हमीपत्र लिहून, हा स्टॅम्प पेपर भारतीय जनता पक्षाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
वचननाम्यातील महत्त्वाचे मुद्दे:
- निवडून आल्यास विकासकामांच्या ठेक्यात सहभागी होणार नाही.
- नगरसेवक पदाचा उपयोग वैयक्तिक संपत्ती मिळविण्यासाठी करणार नाही.
- माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
- माझ्याकडे भारतात कुठेही स्वतःची जमीन नाही.
- माझ्या बँक खात्यांमध्ये केवळ ₹25,000 इतकाच शिल्लक आहे; पाच वर्षांनंतर लेखाजोखा जनतेसमोर मांडेन.
- दोन वर्षांनंतर मतदारांना मला परत बोलाविण्याचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करेन.
या वचननाम्यामुळे व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार हे धुळे राजकारणात पारदर्शकतेचा नवा आदर्श ठरत असून नागरिकांत त्यांच्या या अनोख्या निर्णयाची चर्चा रंगली आहे.


