धुळे : दाट धुक्याचा भेंडी पिकावर तडाखा; उत्पादन कोसळल्याने शेतकरी मोठ्या संकटात
प्रतिनिधी: नागिंद मोरे | धुळे
धुळे तालुक्यातील कापडणे–देवभाने शिवारातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांवर दाट धुक्याचे नवीन संकट कोसळले आहे. काही दिवसांपासून वाढलेल्या धुक्यामुळे भेंडी पिकाची वाढ खुंटली असून रोगराईनेही डोके वर काढले आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
उत्पादनात मोठी घसरण
पूर्वी दोन बिघ्यांत 20 कॅरेटपर्यंत भेंडीचे उत्पादन मिळत होते. मात्र सध्या ते घटून फक्त 5 कॅरेटपर्यंत आले आहे. पिकाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही कमी झाल्याने बाजारभावही घसरले आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना पिकातून मजुरीदेखील निघेनाशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकरी विजय शांताराम माळी यांनी व्यक्त केलेली खंत –
“शेतीवर हजारो रुपये खर्च केले, पण फारसे काही हातात पडत नाही. मजुरी भागवणेही कठीण झाले आहे.”
शासनाकडे मदतीची अपेक्षा
दाट धुक्यामुळे पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पिकनुकसानीच्या पंचनाम्याची आणि आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
हवामानातील अनियमितता वाढत असल्याने शेतकरी विशेष सहाय्य पॅकेजची देखील मागणी करीत आहेत.


