धुळे: कोट्यवधींचा निधी असूनही रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट; गावकऱ्यांचा जनआंदोलनाचा इशारा
पालकमंत्र्यांकडे चौकशीची मागणी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
चिमठाणे प्रतिनिधी: अविनाश वाडीले – चिमठाणे ते दलवाडे मार्गाने पुढे अमराळेपर्यंत सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेक वर्षांपासून निधीअभावी बंद असलेले हे काम नुकतेच सुरू झाले असले तरी कामाचा दर्जा अत्यंत घसरणारा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हा रस्ता अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने शेतकरी, विद्यार्थी व कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, ठेकेदाराने खोदकाम न करता थेट खडी व डांबर टाकून काम सुरू केल्याने रस्त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनेक ठिकाणी डांबराचे प्रमाण खूपच कमी असून वरच्या थरावर खडी उघडी दिसत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
साइड पट्ट्यांवर अर्धवट माती भरल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी धोका आणखीनच वाढला आहे. स्थानिकांनी अनेकदा ठेकेदाराला काम सुधारण्यासाठी सांगितले, तरीही ठेकेदाराने नागरिकांच्या सूचना दुर्लक्षून मनमानीपणे काम सुरूच ठेवले असल्याचा आरोप आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की कोट्यावधींचा निधी मिळालेल्या या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदार व संबंधित इंजिनीअर यांनी गुणवत्तेची कोणतीही काळजी घेतलेली नाही. रस्त्याची गुणवत्ता तपासून हे काम तात्काळ बंद करून योग्य पद्धतीने पुन्हा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर चिमठाणे गावाचे भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील यांनी पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी तातडीने हस्तक्षेप करून या कामाची चौकशी करावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि त्याचे बिल रोखावे, अशी मागणी केली आहे.
काम योग्य दर्जाने न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. ठेकेदार व इंजिनीअर यांच्यावर शासन कोणती कारवाई करते याकडे परिसरातील सर्वांचे लक्ष लागून आहे.


