धुळे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24×7 सायबर पेट्रोलिंग सुरू; बेकायदेशीर पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई
धुळे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे सायबर पोलीस ठाण्याने 24×7 विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार हे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अधिकारी व 12 अंमलदारांचे एकूण 4 सोशल मीडिया मॉनिटरिंग पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक सतत खालीलप्रमाणे बेकायदेशीर कंटेंटवर लक्ष ठेवत आहे:
- चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती
- अफवा पसरवणारा मजकूर
- धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारी पोस्ट
- द्वेषपूर्ण भाषणे (Hate Speech)
- धमकी देणारे संदेश
- भडकावू मीम्स, रील्स आणि व्हिडिओ
बेकायदेशीर पोस्टवर कठोर कारवाई
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती किंवा धार्मिक/जातीय संवेदनशीलता भडकवणारी सामग्री पोस्ट करणाऱ्यांवर खालील बीएनएसच्या कलमान्वये कायदेशीर कारवाई होणार आहे:
- BNS 197 – राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या पोस्ट
- BNS 196 – समाजात तेढ निर्माण करणारी सामग्री
- BNS 298 – धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट
- BNS 353(2) – खोटी विधाने, अफवा पसरवणे आणि द्वेषभाव निर्माण करणे
पोलीस अधीक्षकांचा इशारा
“सोशल मीडियावर पोस्ट करताना नागरिकांनी जबाबदारीने वागावे. चुकीची, भडकावू किंवा समाजात तेढ निर्माण करणारी कोणतीही पोस्ट आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.


