धुळे तालुका पोलीस ठाण्याची कामगिरी – ३३७ किमी पाठलाग करून तीन आरोपी जेरबंद; चोरीचे वाहन व बँडसाहित्य हस्तगत
धुळे तालुका पोलीस ठाणे भाग-5 अंतर्गत अपराध क्रमांक 669/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार दाखल झालेल्या वाहनचोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करीत तीन आरोपींना अटक करून ₹70,000 किंमतीचे टाटा LPT वाहन (MH-04-CU-1172) तसेच त्यावरील स्पीकर, मिक्सर व बँड साहित्य हस्तगत केले आहे.
तक्रारदार सतीश संजय मोरे यांच्या मालकीचे वाहन दिनांक 03/11/2025 रोजी रात्री 09.00 ते 06/11/2025 दुपारी 04.30 या कालावधीत नेर शिवारातून अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संजय बांबळे यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रकरणाचा तपास गतीने सुरू करण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञान + पारंपरिक तपास = मोठे यश
प्रकरणाच्या तपासात पोहवा उमेश पवार आणि पोकॉ कुणाल शिंगाणे यांनी पारंपरिक तपास पद्धती वापरत आरोपींचा मागोवा घेतला. तर पोकों गजेन्द्र मुंडे, पोकॉ राहुल देवरे आणि पोकॉ प्रतीक देसले यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जिमीनी अॅपचा वापर करून 337 किमीपर्यंतचे एकूण 59 सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले.
सलग 72 तास न झोपता धुळे–अमळनेर–धरणगाव–जळगाव–भुसावळ–खामगाव–तरोडा–मेडशी (ता. मालेगाव, जि. वाशिम) या मार्गावर शोधमोहीम राबवून चोरी गेलेले वाहन व त्यावरील साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. याठिकाणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचे वाहन पुन्हा धुळे येथे आणण्यात आले.
तपासातील सहभागी अधिकारी
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली—
• पोहवा उमेश पवार
• पोकॉ कुणाल शिंगाणे
• पोकों गजेन्द्र मुंडे
• पोकॉ राहुल देवरे
• पोकॉ प्रतीक देसले
यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा दिनेश देवरे करीत असून आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले जात आहे.


