धुळे महानगरपालिका निवडणूक : निर्णय अधिकाऱ्यावर ‘संघटित गुन्हेगारी’चा गुन्हा दाखल करा — शिवसेना (ठाकरे गट)ची मागणी
धुळे
प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या तांत्रिक चुका, त्रुटी व घोळाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व घोळामुळे मतदारांची दिशाभूल होत असून राज्य निवडणूक आयोगाचीही बदनामी होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
प्रारूप मतदार यादीत गंभीर चुका — ठाकरे गटाचा आरोप
शिवसेना (ठाकरे गट)ने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील मुद्दे अधोरेखित केले आहेत:
- प्रभाग सीमांकनाचा पूर्णपणे विचार न करता नावे टाकणे
- मृत मतदारांची नावे कायम ठेवणे
- नवमतदारांची नावे यादीतून वगळणे
- नागरिकांना व उमेदवारांना मनस्ताप देणाऱ्या तांत्रिक त्रुटींवर दुर्लक्ष
यामुळे धुळे महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
निर्णय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर ‘संघटित गुन्हेगारी’ स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी केली आहे. तसेच हे निवेदन राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावे अशी विनंतीदेखील करण्यात आली.
पक्षाची भूमिका
शहरातील मतदार यादीतील गोंधळामुळे नागरीकांना मनस्ताप होत असून यावर तात्काळ सुधारक पावले उचलली नाहीत तर लोकशाही प्रक्रियेलाच बाधा येईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.


