शिंदखेडा रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’; पुणे गाडी सुरू करा आणि एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्या, रेल्वे संघर्ष समितीची मागणी
धुळे, शिंदखेडा: शिंदखेडा रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा आणि पुणे गाडी पुन्हा सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी ‘रेल्वे संघर्ष समिती’ने आज रेल रोको आंदोलन केले. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्याने संतप्त आंदोलकांनी थेट रेल्वे रुळांवर उतरून घोषणाबाजी केली.
नवजीवन एक्स्प्रेस १५-२० मिनिटे थांबवली
रेल्वे संघर्ष समिती गेल्या अनेक काळापासून या मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. मात्र, प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आज त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आंदोलकांनी शिंदखेडा स्थानकावर रेल्वे रुळांवर बसून घोषणा दिल्या आणि आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
आंदोलनादरम्यान, रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला करण्याचा आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. नवजीवन एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर येताच, आंदोलकांनी रेल्वे रुळांवर मध्यभागी थांबवून ठेवले. यामुळे तब्बल १५ ते २० मिनिटांपर्यंत रेल्वे थांबून राहिली.
या आंदोलनाची पूर्वसूचना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली होती. आंदोलक गोविंद प्रकाश मराठे यांनी सांगितले की, “आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.” या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला.