धुळ्यात देवपूर घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; पांझरा नदीकाठावरून आरोपी जेरबंद, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे शहरातील देवपूर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करत यशस्वी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पांझरा नदीकाठावर सापळा रचून जळगाव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार दत्तु अशोक ठाकरे याला शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपीकडून ₹1,78,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
घटना अशी घडली
काही दिवसांपूर्वी, मध्यरात्री देवपूरच्या सुयोगनगर क्षेत्रात राधेशाम सोनगीरे यांच्या बंद घरातून ₹4 लाखांची रोकड चोरीला गेली होती. घरफोडीचा या भागात मोठा धक्का बसला होता.
तपासादरम्यान तांत्रिक माहिती व गुन्हेगारी रेकॉर्डचा अभ्यास करताना स्थानिक गुन्हे शाखेला या चोरीत चोपड्यातील सराईत गुन्हेगार दत्तु अशोक ठाकरेचा हात असल्याची माहिती मिळाली.
पांझरा नदीकाठावरून अटक
मिळालेल्या माहितीच्या आधारे LCB पथकाने धुळ्यातील पांझरा नदीकाठावर सापळा रचला. सापळा हेरल्यावरही दत्तु पळ काढू पाहत होता; मात्र पथकाने त्याला वेढा देत शिताफीने ताब्यात घेतले.
सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांची उत्तम कामगिरी
या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांचे मार्गदर्शन लाभले. LCB पथकाच्या शिताफी व तात्काळ कारवाईमुळे देवपूर घरफोडी प्रकरणातील महत्त्वाचा गुन्हेगार जेरबंद झाला आहे.
प्रतिनिधी : नागिंद मोरे, धुळे


