धुळ्यात स्मार्ट मीटरविरोधात मनसे आक्रमक; सक्ती केल्यास ‘खळळ-खट्याक’ आंदोलनाचा इशारा
राज्यात महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची मोहीम गती घेत असताना, धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास ‘मनसे स्टाईल खळळ-खट्याक आंदोलन’ उभारू, असा कडक इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला.
मनविसेचे धुळे उपाध्यक्ष शामक दादाभाई यांनी सांगितले की, महावितरण स्मार्ट मीटर मोफत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात १२ हजार रुपयांचा खर्च आणि त्यावरील व्याजाचा भार 1 एप्रिल 2025 पासून थेट ग्राहकांच्या खिशातून वसूल करणार आहे. त्यामुळे हा निर्णय सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा टाकणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.
वीज कायदा 2003नुसार मीटरची निवड हा ग्राहकाचा मूलभूत अधिकार असूनही महावितरणकडून सक्ती केल्याचा आरोप मनसेने केला आहे. ही सक्ती तात्काळ थांबवावी आणि सध्याचे पोस्टपेड मीटरच कायम ठेवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी, उपाध्यक्ष शामक दादाभाई, जितेंद्र बैसाने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली आणि निवेदन सादर केले.
प्रतिनिधी : नागिंद मोरे


