धुळे: एसआरपीएफ च्या प्रतिबंधित क्षेत्रात बिबट्याचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
धुळे शहरातील साक्री रोडवरील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) वसाहती परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी वसाहतीत फिरणाऱ्या या बिबट्याचे काही व्हिडीओ नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले असून, ते पाहताच परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
एसआरपीएफ परिसरातील सुमारे 500 सदनिका, कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि सततचा जवानांचा वावर असूनही बिबट्या या भागात दिसल्यामुळे रहिवासी धास्तावले आहेत. जंगलाजवळील शांत परिसर आणि घनदाट झाडांमुळे वन्य प्राणी येथे सहज पोहोचतात. मात्र बिबट्याचा वारंवार वावर रहिवाशांसाठी गंभीर धोका निर्माण करणारा आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) यांनी वनविभागावर नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “बिबट्याला त्वरीत जेरबंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.
रहिवाशांचे म्हणणे आहे की, बिबट्याचा वावर थांबवण्यासाठी वसाहतीजवळ पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि वनविभागाने तातडीने लक्ष घालावे.
प्रतिनिधी : नागिंद मोरे

