धुळ्यात भिक्षेकरी वृध्देचा निर्घृण खून; मनगटी घड्याळामुळे 24 तासांत आरोपी गजाआड
धुळे : मोहाडी उपनगरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत राहणाऱ्या 75 वर्षीय भिक्षेकरी लीलाबाई हिरामण सुर्यवंशी यांचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केलेल्या आरोपीला लीलाबाईंनी प्रतिकार केल्याने आरोपीने धारदार स्टिलच्या खुरपीने त्यांच्या गुप्तांगात वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. घटनास्थळी मिळालेल्या मनगटी घड्याळाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली.
घड्याळाचा फोटो गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. त्यावरून संशयित सागर राजू कोळी (वय 25) याची ओळख पटली. त्याला सुरत बायपास परिसरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे निर्देश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार करीत आहेत.


