धुळ्यात पहाटे धाडसी चोरी; खोलगल्लीतील भांडे दुकानातून 1 लाख 90 हजारांची रोकड लंपास
धुळे : धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या खोलगल्ली भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. खोलगल्ली क्रमांक 4 येथील ‘रमणलाल पूनमचंद जैन’ या प्रसिद्ध भांडे दुकानात पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
दुकानाचे मालक वरच्या मजल्यावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. प्राथमिक माहितीनुसार ही चोरी पहाटे दोन वाजेनंतर घडली असून, चोरट्याने दुकानातील 1 लाख 80 हजार रुपये रोख आणि आठ ते दहा हजार रुपयांची चिल्लर, असा एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
सकाळी सुमारे आठ वाजता दुकान उघडण्यासाठी मालक खाली आल्यानंतर शटरचे कुलूप तुटलेले दिसताच चोरीचा प्रकार उघड झाला. या घटनेचे विशेष म्हणजे, चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजमध्ये चोरटा स्पष्टपणे दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे


