धुळ्यात आंतरराज्यीय घरफोडी टोळी गजाआड; 15.60 लाखांचे सोने जप्त, 6 गुन्ह्यांची उकल
धुळे : धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक करून पोलिसांनी सहा घरफोडी गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 15 लाख 60 हजार रुपये किमतीचे 120 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत केली आहे.
दिनांक 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान कुसुंबा (ता.जि. धुळे) येथे वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याच कालावधीत कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे व अकलाड या गावांमध्ये घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तपास सुरू केला. तपासादरम्यान तीन राज्यांतील सुमारे 375 ANPR सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले.
सलग 17 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांचे पथक थेट गुजरातमधील दाहोद व गोधरा जिल्ह्यांपर्यंत पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी धुळे तालुक्यातील सहा घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्या स्थानिक साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपींविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता. गुन्हा करून ते तात्काळ परराज्यात पसार होत असल्याने ते पोलिसांच्या अभिलेखात आले नव्हते.
या कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी व पथकाकडून सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.


