शिंदखेडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे नऊ लाख ६९ हजारांची एटीएम चोरी हाणून पाडली
शिंदखेडा पोलिस ठाण्याच्या सतर्कतेमुळे तब्बल नऊ लाख ६९ हजार रुपयांची एटीएम चोरी थोपवण्यात यश आले आहे. चोरट्यांनी वाहनाला दोरीच्या सहाय्याने एटीएम मशीन बांधून ते उखडून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने पळ काढावा लागला.
आज मंगळवार (दि. ३०) पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी कॅश मॅनेजमेंट सिस्टिम (एसआयएस) कंपनीच्या गुरगाव (हरियाणा) येथील कंट्रोल रूमला शिंदखेडा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) एटीएममध्ये छेडछाड झाल्याचा अलर्ट प्राप्त झाला. हा अलर्ट तात्काळ शिंदखेडा पोलिस ठाण्याला देण्यात आला.
माहिती मिळताच शिंदखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे व त्यांचे गस्ती पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. अवघ्या काही मिनिटांत पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचताच एटीएम उखडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे एटीएम मशीन, दोरी व अन्य साहित्य तिथेच सोडून पसार झाले.
प्राथमिक तपासात चोरट्यांनी ब्लॅक बोलेरो पिकअप व्हॅनचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोरीच्या सहाय्याने संपूर्ण एटीएम वाहनाला बांधून ते उखडून नेण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र, एटीएममधील नऊ लाख ६९ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर शिंदखेडा परिसरात तसेच आजूबाजूच्या भागात नाकाबंदी करण्यात आली असून मध्यप्रदेश व गुजरात पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोलनाक्यांवरील सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होऊन तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत.
वेळीच मिळालेला अलर्ट, पोलिसांची तत्परता आणि जलद प्रतिसाद यामुळे मोठी चोरी टळल्याने नागरिकांनी शिंदखेडा पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे. दरम्यान, आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याच्या शक्यतेने तपासाची दिशा त्या अनुषंगाने वळवण्यात आली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. एटीएम सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामीण व निमशहरी भागातील एटीएम केंद्रांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शिंदखेडा | प्रतिनिधी नागिंद मोरे


