धुळ्यात भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध; आणखी विजयांची शक्यता – आ.अनुप अग्रवाल
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत भाजपाने विजयाची दमदार सुरुवात करत प्रभाग क्रमांक 1 मधून उज्वला भोसले आणि प्रभाग क्रमांक 6 मधून ज्योत्स्ना पाटील या दोन उमेदवारांना बिनविरोध विजयी करून घेतले आहे. त्यामुळे धुळ्यात भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला होता आणि प्रवेशानंतर लगेचच त्यांना बिनविरोध विजय मिळाला आहे. या यशामुळे भाजपाने महानगरपालिका निवडणुकीत आपले विजयाचे खाते उघडले असून आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद अधिक वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, उमेदवारी माघारीनंतर भाजपाचे आणखी उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता असल्याचा विश्वास आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. “भाजपाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि जनतेचा विश्वास यामुळे येत्या तारखेपर्यंत आणखी बिनविरोध विजय होतील,” असे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात भाजपाने आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत या घडामोडींमधून मिळत असून, इतर पक्षांच्या गोटात मात्र खळबळ उडाल्याचे चित्र आहे.


