धुळ्यात दोन गटांत धुमश्चक्री; गोळीबार व कोयत्यांचे वार, चौघे जखमी; परस्पर गुन्हे दाखल, सहा अटकेत
धुळे : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी (दि. २) धुळे शहरात निवडणूक वादातून रक्तरंजित संघर्ष उफाळून आला. देवपूर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत गोळीबार, कोयत्यांचे वार आणि जीवघेणे हल्ले झाल्याने शहरात खळबळ उडाली. या घटनेत चौघे जण जखमी झाले असून देवपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या फिर्यादीत गौरव रमेश नरोटे (रा. नेहरुनगर, देवपूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेदरम्यान रामनगर पाण्याच्या टाकीजवळ वाद झाला. त्यानंतर दुपारी नेहरुनगर शनिमंदिर परिसरात पुन्हा दोन गट समोरासमोर आले. यावेळी काही आरोपींनी हवेत गोळीबार केला, तर लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उमेश कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटाला गोळी लागल्याची नोंद आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात आर्म अॅक्ट, खुनाचा प्रयत्न व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने दाखल झालेल्या परस्पर फिर्यादीत यश बोरसे यांनी सांगितले की, त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत रमेश बोरसे, कैलास चौधरी व त्यांचा मुलगा राजवीर चौधरी हे जखमी झाले. या प्रकरणीही आर्म अॅक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
दोन्ही बाजूंच्या तक्रारीनुसार एकूण १२ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी देवपूर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही तक्रारींमध्ये महापालिका निवडणूक, उमेदवारी अर्ज आणि माघारीचा थेट संदर्भ असल्याने निवडणूक प्रक्रियेदरम्यान दबाव, दहशत व हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


