शिरपूर तालुक्यात भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील भोरखेडा गावाजवळ रस्ते विकासाच्या कामादरम्यान एका भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत नकुल दीपक चौधरी आणि हर्षल दीपक चौधरी या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भोरखेडा परिसरासह संपूर्ण शिरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थंडीच्या कडाक्यात दोन्ही भाऊ रस्त्यालगत असलेल्या चहाच्या स्टॉलजवळ थांबलेले असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
तरुण वयातील दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना देखील दिसून येत आहे.
दरम्यान, मागील काही काळापासून या ग्रामीण मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून, वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. नागरिकांनी यासंदर्भात यापूर्वीही तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, शिवसेनेचे नेते हेमंत पाटील तसेच अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी आणि उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले.
पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद घेतली असून, संबंधित डंपर चालकावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, या घटनेनंतर परिसरातील रस्ते सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि अवजड वाहनांच्या वेगावर निर्बंध आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दिवंगत नकुल आणि हर्षल चौधरी यांच्या पश्चात आई आरती चौधरी, वडील दीपक चौधरी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.


