धुळे शहरातील प्रभाग ७ मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे बॅनर फाडल्याची घटना; कठोर कारवाईची मागणी
धुळे | प्रतिनिधी
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून, संबंधित उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून, मतदारांपर्यंत नाव आणि निवडणूक चिन्ह पोहोचावे यासाठी बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. मात्र प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडून टाकल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला असून, ही घटना जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बॅनर फाडणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देण्यात येणार असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक काळात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.


