धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील गुरुद्वारा हिंसाचार आणि अडवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या मुख्य आरोपी रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपीच्या गुरुद्वारातील निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणानंतर रणबीरसिंग खालसा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी त्याच्या गुरुद्वारातील घराची झडती घेतली असता धक्कादायक पुरावे हाती लागले. झडतीदरम्यान ८ एमएम (KF) प्रकारच्या ८ जिवंत गोळ्या, एसएलआर रायफलसारख्या दिसणाऱ्या काडतुसे, ४५ एमएम (HPM) प्रकारच्या ३५ जिवंत पिस्तूल काडतुसे तसेच दोन रिकामे मॅगझिन पोलिसांनी जप्त केले आहेत.
या बेकायदेशीर शस्त्रसाठ्याप्रकरणी आरोपीविरोधात शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ अंतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला पुन्हा न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणीही अतिरिक्त कलमे धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, त्या अंतर्गत देखील आरोपीला पुन्हा अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा तपास अधिक व्यापक करण्यात येत असून, आरोपीच्या संपर्कातील इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.


