धुळ्यात वडजाई रोड परिसरात एलसीबीचा छापा; पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपी अटकेत
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सलग दुसऱ्या दिवशी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई केली आहे. वडजाई रोडवरील कबीरगंज परिसरात एका युवकाकडून देशी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार अवैध शस्त्रांवर विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत 11 जानेवारी 2026 रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अपली हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला. त्यावेळी आसीफ अहमद खलील अहमद अन्सारी (वय 31, रा. बंदे नवाज कॉलनी, वडजाई रोड, धुळे) हा दहशत माजवण्याच्या उद्देशाने विना परवाना देशी कट्टा बाळगताना आढळून आला.
तपासात आरोपीकडून सुमारे 40 हजार रुपये किमतीचा देशी पिस्तुल (मॅगझीन, फायरिंग पिन व स्ट्रिगरसह) तसेच 1 हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम तसेच मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
निवडणुकीच्या काळात शहरात कोणत्याही प्रकारची दहशत किंवा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशाच प्रकारे कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


