शिरपूरमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजामुळे चार वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरला; 15 टाके, प्रकृती स्थिर
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात नायलॉन मांजामुळे घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. पतंगाच्या मांजाने चार वर्षांच्या कपिल पिंपळे या चिमुकल्याचा गळा चिरला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. कपिल आपल्या नातेवाईकांसोबत मोटरसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यात आडवा आलेला मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि जोरदार रक्तस्राव झाला.
या अपघातात कपिलच्या गळ्यावर सुमारे 12 सेंटीमीटर खोल जखम झाली. त्याला तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत 14 ते 15 टाके घालून त्याचा जीव वाचवला. सध्या कपिल आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता सयाजीराव भामरे यांनी दिली आहे.
दरम्यान, नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रास विक्री व वापर सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कपिलच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चिनी आणि नायलॉन मांजाचा वाढता वापर अनेकांसाठी जीवघेणा ठरत असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.


