धुळे मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या घरावर दगडफेक, राजकीय वातावरण तापले
धुळे | प्रतिनिधी
धुळे महानगरपालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शहरात खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या दगडफेकीत मनोज मोरे यांच्या घराबाहेर ठेवलेल्या खुर्च्यांचे नुकसान झाले असून घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. घरासमोर विटांचा खच पडलेला दिसून येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भाजपाच्या प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे व त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मतदानाच्या आधीच राजकीय दबाव व दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मतदानाच्या अवघ्या काही तास आधी घडलेल्या या घटनेमुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.


