Dhule News लळींग टोलनाक्यावर मोहाडी नगर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकसह १ कोटींचा दारूसाठा जप्त
धुळे (प्रतिनिधी) :
धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी मद्य तस्करांविरोधात मोठी कारवाई करत लळींग टोलनाक्याजवळ ट्रकसह तब्बल १ कोटी २ लाख १६ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दारू तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणारा एक संशयास्पद ट्रक पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता त्यात १ हजार ५०० बॉक्स विदेशी दारू आढळून आली. संबंधित दारूसाठा बेकायदेशीररित्या वाहतूक केला जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत ९२ लाख १६ हजार रुपये किमतीची विदेशी दारू आणि १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १ कोटी २ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहाडी नगर पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


