Dhule News धुळे पोलिसांचा ‘करेक्ट कार्यक्रम’! ४० लाखांच्या मुद्देमालासह विदेशी दारूचा मोठा साठा जप्त
धुळे | प्रतिनिधी
जळगावकडून धुळे मार्गे गुजरात राज्याकडे बेकायदेशीररित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शिताफीने कारवाई करत मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना जळगाव–धुळे मार्गे गुजरातकडे जाणाऱ्या टाटा कंपनीच्या कंटेनर (क्रमांक RJ 52 GA 3630) मधून बेकायदेशीररित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करून पुढील कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक मुंढे व पथकाला सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2.30 वाजता, धुळे शहरातील नवे सिव्हिल हॉस्पिटलसमोरील चक्करबर्डी, साक्री बायपास हायवे परिसरात पथकाने सापळा रचून सदर कंटेनर अडवला.
कंटेनर चालकाकडे विचारपूस केली असता त्याने आपले नाव अजय राजाराम वानखेडे (वय 52), व्यवसाय – चालक, रा. बाबू घनशामदास नगर, केशरबाग रोड, इंदोर, मध्यप्रदेश असे सांगितले. कंटेनरमधील मालाबाबत प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे देत स्पेअर पार्ट्स असल्याचे सांगितले.
मात्र पंचांसमक्ष तपासणी केली असता कंटेनरमध्ये
KINGFISHER EXTRA STRONG PREMIUM BEER चे 400 बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 24 कॅन असून प्रत्येक कॅनमध्ये 500 एमएल बिअर आहे. सदर कॅनवर “FOR SALE IN MADHYA PRADESH ONLY” असा उल्लेख आढळून आला.
📌 जप्त मुद्देमाल:
- विदेशी बिअर : ₹15,36,000/-
- टाटा कंटेनर (मॉडेल LPT 2518, मरून रंग) : ₹25,00,000/-
- एकूण मुद्देमाल : ₹40,39,000/-
फक्त मध्यप्रदेश राज्यात विक्रीसाठी परवाना असलेली बिअर बेकायदेशीरपणे गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी अजय राजाराम वानखेडे याच्याविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


