धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसीतील बांभळे शिवारात मोबदला न दिल्याने शेतकरी आक्रमक
धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या बांभळे शिवारातील गट क्रमांक 105 मधील शेतकरी सध्या तीव्र संताप व्यक्त करत आहेत. शासन व एमआयडीसी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या थेट उद्योजकांना दिल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या जमिनी शासनाने जबरदस्तीने आपल्या नावे करून घेतल्या असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही. मात्र, अशाच जमिनी एमआयडीसीमार्फत उद्योगांसाठी विकण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“जोपर्यंत आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जमीन उद्योजकांच्या ताब्यात देणार नाही,” असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर सर्व शेतकरी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे नरडाणा एमआयडीसी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.


