धुळ्यात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद
धुळे शहरातील शनी नगर भागात राहणाऱ्या गणेश पिंटू मोरे या तरुणाचा काल रात्री संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजत असून, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत गणेश मोरे याचे शव धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मात्र, गणेशच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाचा अपघात नसून घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिस ठाण्यात हजर होत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जोरदार गदारोळ केला.
दरम्यान, पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हा अपघाताचा प्रकार असल्याचे दिसून येत असून त्यानुसार प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, पोलिसांचे एक पथक तपासासाठी रवाना करण्यात आले आहे.
शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आणि तपासानंतर हा मृत्यू अपघात आहे की घातपात, याबाबत स्पष्टता येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत मयताच्या नातेवाईकांनी शांतता राखून अंत्यसंस्कार करावेत, अशी विनंती पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी केली आहे.


