साक्री धुळे: मारहाण प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुस्लिम समाजाचे ठिय्या आंदोलन
साक्री, धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
साक्री शहरात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर काही तरुणांवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी आज मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून निघालेला हा महामोर्चा थेट साक्री पोलिस ठाण्याच्या आवारात पोहोचला, जिथे मोर्चेकऱ्यांनी सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले.
कबुतरांच्या वादातून साक्रीत एका तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, दोंडाईचा येथील नगरसेवक नबु पिंजारी साक्रीत आले असता त्यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेनंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत प्रत्यक्ष घटनेशी संबंध नसलेल्या तरुणांची नावेही समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे.
या प्रकरणात बेकसूर तरुणांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने साक्रीत वातावरण तापले आहे. न्याय मिळावा आणि निरपराध तरुणांवर अन्याय होऊ नये, यासाठी मुस्लिम समाजाने एकजूट दाखवत महामोर्चा काढला.
मोर्चेकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. या आंदोलनामुळे साक्री शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.


